(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरालगतच्या नाचणे-शांतीनगर परिसरात आईच्या गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून करणाऱ्या मुलाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल १९ दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.
अनिकेत शशिकांत तेली (वय २५) असे या संशयित तरुणाचे नाव असून, त्याने आपल्या आईचा पूजा शशिकांत तेली (वय ४५) खून केला होता. २६ ऑगस्ट रोजी पहाटे हा थरार घडला. आई गाढ झोपेत असल्याची खात्री करून अनिकेतने स्वयंपाकघरातून धारदार चाकू आणला आणि तिचा गळा चिरला. झोपेतच झालेल्या या हल्ल्यात पूजा यांना किंचाळण्याचीही संधी मिळाली नाही. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आईला ठार केल्यानंतर अनिकेतने स्वतःच्याही मनगटांच्या शिरा कापल्या आणि विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीभर तो घरात तडफडत राहिला. पहाटे जीव मुठीतून सुटत असल्याची जाणीव होताच त्याने शेजारी राहणाऱ्या चुलती आरती तेली यांच्या दारावर टकटक केली आणि आईचा खून केल्याची कबुली दिली. यावेळी चुलतीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अनिकेतला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अनिकेत रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांची देखरेख त्याच्यावर होती. बुधवारी संध्याकाळी रुग्णालयातून सुटताच त्याला औपचारिकरीत्या अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून, पुढील चौकशी आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

