(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील २४ तासांत हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण-गोवा पट्टा तसेच मराठवाड्यातील काही भागांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन तासांत मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचे पडसाद कोकणातही उमटू लागले आहेत. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच आकाश ढगांनी व्यापले असून वातावरणात कमालीची घुसमट जाणवत आहे. काळ्या ढगांच्या गर्दीमुळे पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी प्रत्यक्ष पाऊस अद्याप झालेला नाही. परिणामी हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाड्यात आणखी भर पडली आहे.
वातावरणातील बदलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः दुपारच्या सुमारास वाढलेली चिकट उष्णता आणि दमट हवेमुळे नागरिकांना घामाच्या धारा लागल्या. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी वातावरणातील अस्थिरता कायम असल्याचे चित्र आहे.

