(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मुलीच्या शाळा प्रवेशासाठी तळोजा येथे गेलेल्या दापोलीतील सामाजिक कार्यकर्त्याच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि बँकेचे सही केलेले कोरे चेकबुक चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा शाळेच्या परिसरातच घडलेल्या या चोरीमुळे तळोजा परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या प्रश्नावरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते मकबूल दिनवारे हे रविवारी पत्नी रुबीना दिनवारे आणि मुलांसह तळोजा एमआयडीसी परिसरातील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड एज्युकेशन सेंटर येथे मुलीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी गेले होते. त्यांनी आपली होंडा सिटी कार शाळेसमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. प्रवेश प्रक्रियेच्या कामानिमित्त ते शाळेत गेले असताना अज्ञात चोरट्याने संधी साधत कारच्या ड्रायव्हर सीटमागील काचेची तोडफोड केली. यानंतर कारमध्ये ठेवलेली १ लाख २० हजार रुपयांची रोकड तसेच रुबीना दिनवारे यांच्या नावाचे आयसीआयसीआय बँकेचे सही केलेले कोरे चेकबुक चोरून नेण्यात आले. ही रोकड फ्लॅट खरेदी व्यवहारासाठी आणण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मकबूल दिनवारे यांनी तत्काळ खारघर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संशयिताचा शोध सुरू केला आहे. ही चोरी पूर्वनियोजित होती का, तसेच या प्रकारामागे एखादी टोळी सक्रिय आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. भरदिवसा शाळेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पार्किंग परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

