( मुंबई )
पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी बचावकार्याला गती देण्यासह दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत प्रशासनाने सुरू असलेल्या बचाव मोहिमेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून मोहीम आज (शनिवार) रात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे आदेश दिले. तसेच दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे १०० टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम, वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने राबविण्यावर भर देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
या उच्चस्तरीय आढावा बैठकीला आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दुर्घटनेनंतरच्या उपाययोजना, बचावकार्याची प्रगती आणि भविष्यातील प्रतिबंधात्मक उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

