(जाकादेवी / वार्ताहर)
वाटद-खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात सुरू असलेल्या १० दिवसीय श्रामणेर शिबिराला वाटद पश्चिम बौद्धवाडी येथील आदर्श महिला मंडळाकडून १० हजार रुपयांचे धम्मदान देण्यात आले. धम्मकार्याला बळ देण्यासाठी महिलांनी दिलेल्या या योगदानाचे उपस्थित भिक्खू संघाकडून विशेष कौतुक करण्यात आले.
खंडाळा-वाटद परिसरातील नागरिक आणि शिबिरार्थींकडून या श्रामणेर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिबिराचे आयोजन धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाच्या उद्देशाने करण्यात आले असून, धम्मप्रसारासाठी अनेक धम्मबंधू आणि समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती पुढाकार घेत आहेत.
या शिबिरासाठी बौद्धजन पंचायत समिती, वाटद (पश्चिम) शा. क्र. ३२ अंतर्गत कार्यरत आदर्श महिला मंडळाने रोख १० हजार रुपयांचे धम्मदान भंते यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी शाखाध्यक्ष पायल जाधव, सचिव दिपाली गमरे, सभापती अंकिता जाधव, पूजा जाधव यांच्यासह जिल्हा समाजकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. ऋतुजा राजेश जाधव आणि साक्षी जाधव उपस्थित होत्या.
महिलांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे आणि धम्मकार्यासाठी दिलेल्या सहकार्याचे उपस्थित भिक्खू संघाने विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील महिलांचे हे योगदान भविष्यातील धम्मचळवळीला निश्चितच गती देणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया भंते यांनी व्यक्त केली.
शिबिरामध्ये शिबिरार्थ्यांना धार्मिक पूजापाठ, त्रिशरण पंचशील, अष्टशील, दशशील तसेच बौद्ध धम्मातील आचार-विचार, जीवनमूल्ये आणि विज्ञानवादी दृष्टिकोन याविषयी सखोल मार्गदर्शन केले जात आहे. बिहार बुद्धगया येथील भंते संघकीर्ती मुनी, अहमदनगर-जेहूर, पुणे येथील अजहन मिलिंद बोधी तसेच मुंबई येथील भिक्खू परमानंद यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशना दिली जात आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक धम्मबंधू तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली असल्याची माहिती शिबिराचे प्रमुख आयोजक डॉ. राजेश जाधव यांनी दिली.

