(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली विकास मंडळ, मुंबई संचलित जनता विद्यालय, आंगवली या प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह परिसराचा गौरव वाढविला आहे. कु. स्वरा अमोल प्रभावळकर आणि कु. श्रुती संतोष भिसे यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
विद्यार्थिनींच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक ए. आर. चव्हाण तसेच शिक्षक सौ. के. व्ही. जाधव, श्रीमती एस. जी. पेडणेकर आणि श्री. एस. एच. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही विद्यार्थिनींच्या यशात महत्त्वाचे ठरले.
आंगवलीसारख्या ग्रामीण भागातील शाळेतील दोन विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने शाळा, पालक आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थिनी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

