(मंडणगड / रत्नागिरी)
कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मंडणगड–बाणकोट राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या महामार्गावरील कामाच्या गुणवत्तेची अक्षरशः पोलखोल केली आहे. रस्ता वरून सुरक्षित असल्याचा भास होत असला, तरी प्रत्यक्षात रस्त्याच्या खालून मोठे भगदाड पडून त्यातून वेगाने पाणी वाहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
रस्त्याचा पाया वाहून गेल्याने हा भाग आतून पूर्णपणे कमकुवत झाला असून, कोणत्याही क्षणी अधिक मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वरून सुरू असलेली वाहतूक पाहता वाहनचालकांना धोका लक्षातही येत नाही. त्यामुळे हा मार्ग अक्षरशः ‘दिसतो सुरक्षित; पण आतून मृत्यूचा सापळा’ बनल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय महामार्गांच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पहिल्याच मोठ्या पावसात रस्त्यांचे असे हाल होत असतील, तर कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित कामात दर्जेदार साहित्य वापरण्यात आले होते का? जलनिस्सारणाची योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही? कामाची तांत्रिक तपासणी नेमकी कोणी केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना द्यावी लागणार आहेत.
दरम्यान, या धोकादायक ठिकाणी अद्याप ठोस संरक्षणात्मक उपाययोजना झालेल्या नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. मुसळधार पाऊस कायम असल्याने रस्त्याची अवस्था आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या भागाची तांत्रिक पाहणी करून वाहतुकीसंदर्भात आवश्यक निर्णय घ्यावा, तसेच संबंधित कामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

