(मुंबई)
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांवर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडम यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्य करणार असून विविध विभागांतील तज्ज्ञांचा त्यात समावेश असेल.
विधानभवनात झालेल्या संयुक्त आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 2024 ते 2026 या कालावधीत राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या तपासणीत सुमारे 16 हजार संशयास्पद दावे आणि शस्त्रक्रिया आढळून आल्या आहेत. त्यापैकी जवळपास 9,500 प्रकरणे एकट्या नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमधील 5 रुग्णालयांवर कारवाई
प्राथमिक चौकशीनंतर नाशिकमधील पाच रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. SIT या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करेल. तसेच फसवणुकीद्वारे मिळवलेला सरकारी निधीही वसूल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
AIच्या मदतीने 13 लाख संशयास्पद प्रकरणांची तपासणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सरकार आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा ॲनालिटिक्स आणि प्रगत विश्लेषण प्रणालीच्या मदतीने सुमारे 13 लाख संशयास्पद प्रकरणांची टप्प्याटप्प्याने चौकशी करणार आहे. यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीसही सक्रिय भूमिका बजावतील.
फॉरेन्सिक ऑडिट आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग
मोठ्या आर्थिक दाव्यांचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) आणि संशयास्पद व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र देखरेख यंत्रणा उभारून ती रिअल-टाइम डॅशबोर्ड प्रणालीशी जोडली जाणार आहे. त्यामुळे संशयास्पद व्यवहारांवर तातडीने लक्ष ठेवणे आणि कारवाई करणे शक्य होईल.
‘भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही’
गरीब आणि गरजू नागरिकांना पारदर्शक व दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य योजनांमधील भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोरडीकर, आमदार डॉ. राहुल आहेर, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

