(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12619) ने एका बिबट्याला चिरडल्याची दुर्घटना रत्नागिरी शहरातील आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलानजीक गुरुवारी (२४ जुलै) रात्री १०.३० च्या सुमारास घडली. धडकेनंतर जागीच मृत्युमुखी पडलेला हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे दोन ते तीन वर्ष वयोगटातील असल्याचे वन विभागाने सांगितले.
या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी आपला स्टाफ घेऊन रात्री ११ वाजता घटनास्थळी भेट दिली. पाहणीअंती बिबट्याचा मृतदेह रेल्वे रुळाशेजारी आढळून आला. त्याची मान धडापासून वेगळी झालेली, जबडा तुटलेला व उजवा डोळा बाहेर आलेला असल्याचे निदर्शनास आले. घटनेची गंभीरता लक्षात घेता विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बचाव आणि शवविच्छेदन प्रक्रिया राबविण्यात आली. दिनांक २५ जुलै रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रणभारे यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वन्यप्राण्याच्या मृतदेहाचे सर्व अवयवांसह अंत्यसंस्कार करून तो नष्ट करण्यात आला.
या प्रक्रियेत रेल्वे पोलीस विभागाचे पीआय सतीश विधाते, एएसआय आर.एस. चव्हाण, कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे, अमर मुकादम, कमलेश पाल, व्ही.एस. पवार, तसेच निसर्गप्रेमी रोहन वारेकर, महेश धोत्रे, आशिष कांबळे, प्रेम यादव यांचा सहभाग होता. वन विभागाच्या वतीने परिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे व वनरक्षक शर्वरी कदम घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी जनतेस आवाहन केले आहे की, कोणताही वन्यप्राणी जखमी, संकटात अथवा अपघातग्रस्त दिसल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा मोबाईल क्रमांक 9421741335 वर त्वरित संपर्क साधावा. वन्यजीवांचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.