(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कुवारबाव येथील साईनगर परिसरात घडलेल्या सूरज झोरे हत्याकांडाने संपूर्ण रत्नागिरी हादरली असतानाच, या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याची मैत्रीण, जी या थरारक घटनेवेळी घटनास्थळी उपस्थित होती, ती हत्येनंतर अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांचाही संशय अधिक गडद झाला होता. मात्र, रत्नागिरी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा ठावठिकाणा शोधून काढला असून ती सध्या मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिला तातडीने चौकशीसाठी रत्नागिरीत हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.
२१ मे रोजी रात्री कुवारबावमधील साईनगर परिसरात हा रक्तरंजित थरार घडला. पोलिस तपासानुसार, मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याच्यासोबत त्याची मैत्रीणही त्या वेळी उपस्थित होती. तिच्याच डोळ्यांदेखत सूरज झोरेवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. मानेवर आणि हातांवर गंभीर जखमा झाल्यानंतरही सूरजने जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यातून तो कसाबसा पळत शेजारच्या एका घराच्या कंपाउंडमध्ये घुसला. मात्र, संतापाने पेटलेल्या आरोपींनी त्याचा पाठलाग करत तिथेही निर्दय हल्ला सुरू ठेवला आणि अखेर त्याचा जीव घेतला.
या प्रकरणातील तपासात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मृत सूरज झोरे याने काही दिवसांपूर्वी सोहमच्या मैत्रिणीला “तू सोहमवर जास्त विश्वास ठेवू नकोस,” असा सल्ला दिला होता. तसेच, तो तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय सोहमच्या मनात निर्माण झाला होता. याच रागातून आणि ‘दोघांमध्ये तिसरा नको’ या विकृत मानसिकतेतून सोहम म्हात्रेने सूरजचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर येत आहे.
प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडलेल्या या भयावह घटनेनंतर संबंधित तरुणी प्रचंड घाबरली होती. हत्येनंतर ती अचानक गायब झाल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तिचा माग काढत ती मुंबईत असल्याचे निष्पन्न केले. आता तिचा जबाब या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मृत सूरजची बहीण नंदा फाले (रा. दहिसर, मुंबई) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी सोहम एकनाथ म्हात्रे (१८), अभिषेक देवानंद राठोड (२२) आणि नजीबुल हसीबार शेख ऊर्फ सोनू (२१) या तिघांना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार कोयताही पोलिसांनी हस्तगत केला असून, या संपूर्ण कटामागील आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

