(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या वास्तवाचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. निवे बुद्रुक येथील सरोदेवाडीमध्ये गतवर्षी वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अजूनही जनमानसातून पुसली गेलेली नसताना, आता ताम्हाणे येथेही सर्पदंश झालेल्या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सलग घटनांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ताम्हाणे येथील रुग्णाला सर्पदंश झाल्यानंतर तातडीने उपचार मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्राथमिक आरोग्य सुविधांमधील त्रुटी, वेळेवर वैद्यकीय मदत न मिळणे आणि आवश्यक यंत्रणेचा अभाव यामुळे संबंधित रुग्णाला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, निवे बुद्रुकमधील घटनेनंतर आरोग्य विभागाने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे या ताज्या घटनेतून स्पष्ट झाल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात सर्पप्रतिबंधक लस (Anti-Snake Venom) उपलब्ध आहे का, उपलब्ध असल्यास प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित का नसतात, असे प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना आजही आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी तालुका किंवा जिल्हा मुख्यालय गाठावे लागते. तोपर्यंत अनेकदा रुग्णाचा जीव धोक्यात येतो किंवा मृत्यू ओढवतो, ही वस्तुस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असताना, आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा अधिक चिंताजनक ठरत आहे. “ग्रामीण भागातील नागरिकांनी नेमके जगायचे कसे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. “आम्ही फक्त मतदानापुरतेच जिवंत राहायचे का?” अशी उद्विग्न भावना अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना निवे बुद्रुकचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष वैभव सुर्वे यांनी, “एक वर्षापूर्वी सरोदेवाडी येथे डॉक्टर उशिरा आल्यामुळे सुनीता यशवंत सुर्वे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. अजून किती निष्पाप जीव अशा हलगर्जीपणामुळे गमवावे लागणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. संबंधितांवर कठोर कारवाई करून ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची मागणीही त्यांनी केली.
ताम्हाणे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमोल गायकर यांनीही देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “ग्रामीण भागात सर्पदंश व हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांचा धोका सातत्याने असतो. अशा वेळी शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरच अनुपस्थित असतील, तर गरीब नागरिकांनी उपचारासाठी कुठे जायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रशासनाला जाग येत नसेल, तर….
संगमेश्वर तालुक्यात सर्पदंशामुळे उपचाराअभावी मृत्यू होण्याची ही दुसरी घटना ठरत असताना, आरोग्य विभागाची निष्क्रियता आता संतापजनक ठरत आहे. निवे बुद्रुक येथील घटनेनंतर मोठमोठी आश्वासने देण्यात आली, चौकशीच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून आली नाही. परिणामी, ताम्हाणे येथे पुन्हा एका निष्पाप जीवाला जीव गमवावा लागला. सलग दोन घटना घडूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर ही केवळ निष्काळजीपणा नसून ग्रामीण जनतेच्या जीवाशी सुरू असलेला क्रूर खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
लोकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का?
डॉक्टर अनुपस्थिती, वेळेत उपचार न मिळणे आणि आपत्कालीन यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे आरोप वारंवार होत असतानाही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अद्याप कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नागरिकांमधून थेट सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक नेमके कोणाची वाट पाहत आहेत? आणखी किती निष्पाप जीव जाण्याची? ग्रामीण भागातील लोकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का की, प्रत्येक मृत्यूनंतर केवळ चौकशी आणि कागदी कारवाईचे नाटक रंगवले जाणार? ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतील, सर्पप्रतिबंधक उपचार व्यवस्था अपुरी असेल आणि गंभीर रुग्णांना तातडीची मदत मिळणार नसेल, तर अशा व्यवस्थेचा उपयोग तरी काय, असे संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

