(चिपळूण)
शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत झालेल्या दागिने चोरीप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीस गेलेले सुमारे ११ तोळे, अंदाजे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात घडली होती. प्रवासासाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी दागिने लंपास केले होते. गर्दीच्या ठिकाणी क्षणार्धात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. यानंतर पीडित महिलेने तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयितांच्या हालचालींचे विश्लेषण तसेच माहितीदारांच्या मदतीने तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीतच आरोपी महिलेला शोधून काढत ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी रामपूर येथील हत्याकांडाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करून आरोपींना अटक करण्याची कामगिरीही पोलिसांनी बजावली होती. त्यानंतर लगेचच या चोरीप्रकरणाचाही वेगाने छडा लावण्यात यश मिळाले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कामगिरीमुळे चिपळूण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

