(चिपळूण / निलेश कोकमकर)
चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा गावाचे सुपुत्र, नायब सुभेदार (आर्मी इंटेलिजन्स) श्री. प्रवीण आत्माराम तांबडे यांनी भारतीय सैन्यात तब्बल २४ वर्षे अभिमानास्पद सेवा बजावून दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती घेतली. या गौरवप्रसंगी ताम्हणमळा ग्रामविकास मंडळ (मुंबई, पुणे आणि ग्रामीण) यांच्यातर्फे दिनांक ६ मे २०२५ रोजी त्यांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणुकीचे आणि स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या मिरवणुकीचा भव्य प्रारंभ गुढे फाटा (रामपूर) येथून सुरू होऊन ती उमरोली – पाथर्डी – शिरवली – मिरवणे – गुढे – डुगवे मार्गे प्रवीण तांबडे यांचे मूळगाव ताम्हणमळा, गवळीवाडी येथे राधाकृष्ण मंदिराजवळ संपन्न झाली. यानंतर आयोजित समारंभात तांबडे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामविकास मंडळातील सर्व सदस्यांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले.
प्रवीण तांबडे यांचे शिक्षण नूतन माध्यमिक विद्यालयात १०वीपर्यंत, त्यानंतर मिलिंद हायस्कूल, रामपूर येथे १२वीपर्यंत, आणि नंतर DBJ कॉलेज चिपळूण येथे आर्मी हॉस्टेलमध्ये वास्तव करून B.Com चे शिक्षण सुरू केले. मात्र, देशसेवेची ओढ असल्याने त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून २८ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय सैन्यात सिपाही पदावर भरती होण्याचा निर्णय घेतला.
सेवेच्या कालावधीत त्यांनी पुणे, नागपूर, दिल्ली मुख्यालय, आसाम, लेह, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, मध्यप्रदेश तसेच पाकिस्तान आणि चीन सीमांवर विविध ठिकाणी जबाबदारीने सेवा बजावली. सैन्यातील अखेरची ८ वर्षे त्यांनी ‘ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर’ या नायब सुभेदार पदावर कार्यरत राहून राष्ट्रसेवा केली.
मनोगतात बोलताना त्यांनी नम्रतेने सांगितले की, “मानाई देवी व माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी सुरक्षितपणे पुन्हा मातृभूमीत परतलो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. सैनिकी परंपरा व त्याग ही आमच्या तांबडे कुटुंबाची परंपरा असून, त्या परंपरेला जपणाऱ्या आणि आज स्मरण ठेवणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

