(चिपळूण)
शहरातील वैद्यकीय क्षेत्रात समर्पित, सुलभ आणि संवेदनशील डॉक्टर म्हणून नाव कमावलेले डॉ. अल्ताफ सरगुरोह (वय ५०) यांचे सोमवारी मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. एका विवाह समारंभासाठी ते मुंबईत गेले असताना अचानक प्रकृती बिघडली. हृदयविकाराचा झटका येताच ते कोसळले. तत्काळ वैद्यकीय मदत मिळूनही उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. अल्ताफ सरगुरोह यांच्यावर त्यांचे वडील गरिबांचे हक्काचे वैद्य म्हणून ओळखले जाणारे डॉ. नूर सरगुरोह यांचे संस्कार घट्ट रुजले होते. वडिलांचा त्याग, प्रामाणिकता आणि ‘पैसा नव्हे, सेवा महत्त्वाची’ हा वैद्यकीय दृष्टिकोन त्यांनी कार्यात उतरवला. अनेक वर्षे दवाखान्यात अविरतपणे काम करत, परवडणाऱ्या दरात उपचार देत त्यांनी हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केला होता.
अजातशत्रू स्वभाव, स्नेहसंपन्न वृत्ती आणि सर्वांना आपलेसे करणारी काम करण्याची शैली यामुळे डॉ. सरगुरोह यांचे शहरात विशेष स्थान होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांची उपस्थिती दखलपात्र राहिली. रोटरी क्लब, चिपळूणचे ते सक्रिय सदस्य होते आणि त्यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवून अनेक उपक्रम राबवले. शहरातील विविध संस्थांमध्ये ते नेहमी पुढाकाराने सहभागी होत, समाजकार्याला हातभार लावत असत.
त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने चिपळूण शहरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे. प्रामाणिकता, माणुसकी आणि गोरगरिबांसाठीचा जिव्हाळा जपणारा डॉक्टर हरवल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, माजी नगरसेविका असलेल्या आई आणि एक मुलगा असा परिवार आहे.

