(चिपळूण/ प्रतिनिधी)
पारंपरिक धार्मिक कार्यक्रमातील ‘मानाच्या ताटावरून’ सुरू झालेला किरकोळ वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील ओझरवाडी येथे घडली. या प्रकरणात ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत कृष्णा फके (वय ७३, रा. ओझरवाडी, शंकर मंदिर समोर, चिपळूण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फके यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे ‘राखणे’चा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान जेवणासाठी मानाचे ताट देण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत अंगावर धाव घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर फके हे स्वतःच्या घरात गेले असता आरोपींनी त्यांच्या पाठोपाठ घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कमरेवर आणि पाठीवर गंभीर मार बसला असून, आरोपींनी उजव्या पायाजवळ जोरदार लाथ मारल्याने पायाला फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अक्षय करंजकर, गणेश शंकर आग्रे, प्रतीक घेवडेकर आणि मंदार गरव (सर्व रा. ओझरवाडी, चिपळूण) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ओझरवाडी येथील शंकर मंदिर परिसरात घडली. घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

