(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या चर्चांनी पुन्हा एकदा वातावरण तापले असून, पुर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात एकजूट दाखवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. “कोणत्याही परिस्थितीत विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्प गावात येऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने अदानी समूह आणि रिलायन्स समूहासोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार बारसू, पुर्णगड आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्यानंतर परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः पुर्णगड येथे रिलायन्स समूहाचा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर पुर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत गावाच्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी एकमुखाने या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेत, भविष्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचे संकेत दिले. “आज या पंचक्रोशीत आंबा, काजू, भात यांसारख्या पारंपरिक पिकांवर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. त्याचबरोबर मच्छीमारी हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. अणुऊर्जा प्रकल्प आल्यास शेती, बागायती आणि समुद्राशी निगडित अर्थकारण उद्ध्वस्त होईल,” अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी बैठकीत व्यक्त केली. पर्यावरणीय परिणाम, विस्थापनाची भीती आणि आरोग्यविषयक धोके यामुळे स्थानिकांमध्ये प्रकल्पाविरोधातील असंतोष अधिक तीव्र होताना दिसत आहे.
बैठकीला किरण तोडणकर, शशिकांत म्हादये, ओंकार अभ्यंकर, संतोष कुरतडकर, मंगेश म्हादये, विनोद साळुंखे, अभिजीत डोंगरे, विजयकुमार शिंदे, अमृत पोकडे, अन्वर पेजे, तयब दर्वेश, सुहासिनी धानबा, नम्रता बिर्जे, उदयराज भाटकर आणि रामचंद्र आंबेरकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कोकणातील बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आधीच अणुऊर्जा आणि औद्योगिक प्रकल्पांविरोधातील भावना तीव्र असताना पुर्णगडमधील या हालचालींना आता व्यापक सामाजिक आणि राजकीय स्वरूप प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

