( रत्नागिरी / वार्ताहर )
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे, रानभाज्या तसेच ग्रामीण भागातील प्रक्रिया पदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहराच्या वतीने व्यावसायिक पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
भाजप शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन त्यांना संरक्षण मिळावे आणि त्यांच्या व्यवसायाला आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागात उत्पादित होणारा शेतमाल, भाजीपाला, फळे आणि रानभाज्या शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या व्यावसायिकांना पावसाळी छत्र्या देण्यात आल्या.
या छत्र्या भाजप रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या. शहर सरचिटणीस निलेश आखाडे, पूजा पवार, प्रज्ञा टाकळे, तेजस पवार, संदीप सावंत, निधी आखाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ७ मधील व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
पावसाळ्यात व्यवसाय करताना या छत्र्यांमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत व्यावसायिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

