(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात अडीच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड कर्मचारी कुणाल आग्रे हे पत्नी आणि अडीच वर्षीय मुलीसह रविवारी रात्री दुचाकीवरून प्रवास करत होते. रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी वालोपे परिसरात आली असता, पाठीमागून वेगाने येणाऱ्या अनियंत्रित टँकरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल आग्रे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवरही उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार होणारे अपघात, भरधाव वाहने आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे शेकडो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावर अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, महामार्ग पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच महामार्गावरील सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यानंतर पोलिसांनी वाहतूक हळूहळू सुरळीत केली. दरम्यान, संबंधित टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

