(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर पोलीस ठाण्याअंतर्गत रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी दत्ताराम बाणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानिमित्त पाचल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी श्री. बाणे यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत, पाचल गाव व परिसरात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पाचल गावात विविध सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, वाहतूक व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था राखणे, नियमित पोलीस गस्त तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या रायपाटण पोलीस दूरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तत्परतेने पार पाडत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. त्यांच्या जनाभिमुख कार्यपद्धतीमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून, त्याबद्दल ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी उपस्थितांनी श्री. बाणे यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय भविष्यातही अधिक दृढ राहील, असा विश्वास व्यक्त केला.
श्री. दत्ताराम बाणे यांना रत्नागिरी पोलीस दलातील तब्बल ३२ वर्षांचा प्रदीर्घ सेवाअनुभव आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, देवरुख पोलीस ठाणे आणि मंडणगड पोलीस ठाणे येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ रायपाटण पोलीस दूरक्षेत्रातील नागरिकांना निश्चितच मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

