(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील नागरिकांना जगण्यासाठी मूलभूत सुविधांचा संघर्ष करावाच लागतो; मात्र दुर्दैवाने मृत्यूनंतरही त्यांच्या यातना संपत नाहीत, असे विदारक वास्तव रत्नागिरी जिल्ह्यात समोर आले आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १९२ गावांमध्ये स्मशानशेडची सुविधा नसल्याने, ग्रामस्थांना आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भीषण बनत असून, दुःखाच्या क्षणीही कुटुंबीयांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
स्मशानभूमी ही केवळ अंत्यसंस्काराची जागा नसून, ती माणसाच्या अखेरच्या प्रवासाशी निगडित सन्मानाची बाब आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा सन्मानही नागरिकांच्या नशिबी नसल्याचे वास्तव आहे. अनेक ठिकाणी स्मशानशेडच उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी असलेल्या शेड अत्यंत जीर्णावस्थेत असून तातडीच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना भर पावसात उघड्यावर उभे राहावे लागते. अग्नी दिल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाल्यास विधींमध्ये अडथळे निर्माण होतात. अशा वेळी मृताच्या कुटुंबीयांसह उपस्थित ग्रामस्थांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही अनेक वर्षे ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शहरी भागांमध्ये आधुनिक सुविधा असलेल्या वैकुंठभूमी, विद्युतदाहिनी आणि सुस्थितीत अंत्यसंस्कार व्यवस्था उभारली जात असताना, ग्रामीण भागात साधे निवारा शेडही उपलब्ध नसणे ही विकासातील दरी अधोरेखित करणारी बाब मानली जात आहे. अनेक ग्रामपंचायतींनी स्मशानशेडसाठी सातत्याने प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला; मात्र ते प्रस्ताव दीर्घकाळ प्रशासकीय पातळीवर धूळ खात पडून राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेकडून सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १९२ गावांमध्ये नवीन स्मशानशेड उभारणे, विद्यमान शेडची दुरुस्ती आणि निवारा शेड बांधण्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामे सुरू होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे. याचबरोबर अनेक गावांमध्ये स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ताही उपलब्ध नाही. त्यामुळे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून, पायवाटेने स्मशानभूमी गाठावी लागते. काही ठिकाणी वीजेची सुविधाही नसल्याने सायंकाळनंतर अंत्यसंस्कार करताना अतिरिक्त अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील स्मशानभूमींचा प्रश्न केवळ शेडपुरता मर्यादित नसून, तो मूलभूत पायाभूत सुविधांच्या अभावाशीही जोडलेला आहे.
जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या स्मशानशेडची तालुकानिहाय संख्या
तालुका | मंजूर स्मशानशेड
मंडणगड | २४
दापोली | २०
खेड | २९
चिपळूण | १६
गुहागर | १२
संगमेश्वर | ३९
रत्नागिरी | २७
लांजा | ३
राजापूर | २२
एकूण | १९२
मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अटळ सत्य असला, तरी अखेरच्या प्रवासात किमान सन्मान आणि आवश्यक सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. मंजूर झालेला निधी कागदावरच न राहता प्रत्यक्ष कामांना गती मिळाली, तरच ग्रामीण भागातील नागरिकांना या वेदनादायी वास्तवातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

