( सावंतवाडी/रत्नागिरी )
सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर मत्स्य विभागाने हालचाल केली आहे. मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन पर्ससीन ट्रॉलर्सना जप्त करण्यात आले. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेश टेमकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळालेला असला, तरीही मच्छीमारामध्ये संतापाचे वातावरण कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर शेकडो पर्ससीन नौका बेकायदेशीर मासेमारी करत आहेत. राज्य सरकारकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत एकाही पर्ससीन नौकेला अधिकृत परवाना नाही, तरीही या नौका सर्रास समुद्रात उतरत आहेत. परिणामी पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यातून मासे पळून जात असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
सोमवारी सायंकाळनंतर सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात, किनाऱ्यापासून अकरा वावांच्या आत बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळताच धडक कारवाई करण्यात आली. त्यावेळी रत्नागिरीच्या तीन ट्रॉलर्सना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मच्छीमारांच्या संतापाला काहीसा तोडगा ठरली असली, तरी पुढील दिवसांत या बेकायदेशीर पर्ससीन नौकांविरोधात मत्स्य विभाग कितपत ठोस पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

