(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावच्या बारा वाड्यांचे गावकर गणपत रामचंद्र दुर्गवळी यांचे सोमवारी 19 जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद झाले. ते 81 वर्षांचे होते.
गणपत दुर्गवळी यांनी मालगुंड गावच्या बारा वाड्यांचे गावकर म्हणून काम करताना मालगुंड गावच्या बारा वाड्यांचे तत्कालीन गावकर कैलासवासी यशवंत उर्फ आप्पा कळंबटे यांच्या बरोबरीने गावातील गावकीचे कामकाज अतिशय उठावदार आणि साजेसे होण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले होते. तसेच आग्राडी व दुर्गवळीवाडी या दोन्ही वाड्या सदैव एकसंघ आणि गुण्यागोविंदाने टिकवून ठेवण्यासाठी कै. यशवंत उर्फ आप्पा कळंबटे यांच्या जोडीला खंबीर आणि भक्कम साथ दिली होती. आग्राडी आणि दुर्गवळीवाडी या दोन्ही वाड्यांचे नमन कार्यक्रम करताना एक उत्कृष्ट मृदुंग वादक म्हणून त्यांनी आपली लोकप्रियता मिळवली होती. या दोन्ही वाड्यांच्या नमन आणि जाकडी कलेचे ते प्रमुख मार्गदर्शक व प्रेरणास्थान होते.
त्याचबरोबर विशेषता: दुर्गवळीवाडीतील तरुणांसाठी ते एक आधारवड ठरले होते. त्यांच्या विशेष मार्गदर्शन ,प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे मालगुंडचे माजी सरपंच दीपक दुर्गवळी यांच्या संपूर्ण जडणघडणीत त्यांचे योगदान सर्वस्वी ठरले होते. त्यामुळे त्यांच्यासारखा एक भक्कम पाठीराखा आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना दीपक दुर्गवळी यांनी त्यांच्या निधनाप्रसंगी व्यक्त केली आहे. तसेच दुर्गवळीवाडीतील जाकडी आणि नमन मंडळाचा एक हरहुन्नरी मार्गदर्शक आणि आधारवड निघून गेल्याने सर्वांच्या आयुष्यातील पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
गणपत दुर्गवळी यांनी मालगुंड ग्रामपंचायतीच्या इतिहासात आग्राडी दुर्गवळीवाडीतील पहिले ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान प्राप्त केला होता.यावेळी सदस्य म्हणून काम करताना त्यांनी दोन्ही वाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले बहुमूल्य भरीव योगदान दिले होते. अतिशय निर्भीड, स्पष्टवक्तेपणा आणि सर्वांशी आपुलकीतून सौजन्याने वागणे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी संपूर्ण मालगुंड गावामध्ये माणुसकीच्या नात्यातून माणसे जोडण्याचे काम केले. मालगुंड ग्रामपंचायतीचे सध्या कार्यरत असलेले वसुली कर्मचारी संजय दुर्गवळी यांचे ते वडील होत.
मालगुंडचे माजी सरपंच दीपक दुर्गवळी यांचे वडील प्रकाश गोपाळ दुर्गवळी यांचे निधन शनिवारी झाल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या तिसऱ्या दिवशी गावकर गणपत दुर्गवळी यांचे निधन झाल्याने आग्राडी व दुर्गवळीवाडीवासियांवर मोठी शोककळा आणि तीव्र दुःखाचे सावट पसरले आहे. गावकर गणपत दुर्गवळी त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच मालगुंड गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच सामाजिक, राजकीय आणि विविध स्तरातील मंडळी त्यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सहा मुली, जावई, सून ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाप्रसंगी संपूर्ण मालगुंड गाववासीय आणि आग्राडी व दुर्गवळीवाडीवासियांकडून भावपूर्ण आदरांजली व श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

