(राजापूर / तुषार पाचलकर)
रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथील ठाणे अंमलदार तथा पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक श्री. कमलाकर पाटील यांचा ५२ वा वाढदिवस पाचल व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा केला. येत्या ३० मे रोजी त्यांची रायपाटण येथून बदली होणार असल्याने नागरिकांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
गेल्या वर्षभरात रायपाटण पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सुमारे २८ गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी श्री. पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. दिवस असो वा रात्र, त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीही खंड पडू दिला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर आणि आत्मीयता निर्माण झाली आहे.
पाचल परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती असूनही, मध्यरात्री २ वाजता आलेल्या तक्रारीवर त्यांनी धाडसाने घटनास्थळी जाऊन प्रश्न सोडवले. अनेक वेळा बिबट्याचा प्रत्यक्ष वावर समोर दिसूनही त्यांनी कर्तव्याशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या या धाडसी आणि प्रामाणिक सेवेमुळे ग्रामस्थांनी त्यांना “जनतेचा पोलीस अधिकारी” अशी भावनिक दाद दिली.
रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे झालेल्या वाढदिवस कार्यक्रमात पाचल गावचे सरपंच श्री. बाबालाल फरास, उपसरपंच श्री. आत्माराम सुतार, पांगरी गावचे सरपंच श्री. अमर जाधव, सरस्वती विद्या मंदिर पाचलचे माजी मुख्य लिपिक श्री. चित्तरंजन शेट्ये, तंटामुक्त अध्यक्ष श्री. देवा पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश रेडीज, श्री. मंगेश भोसले, श्री. समीर खानविलकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक सक्रे, श्रीराम मित्र मंडळ पाचलचे अध्यक्ष श्री. मंगेश उर्फ बंधू कुडतरकर, श्री. सुधीर सक्रे, रायपाटण विद्यालयाचे श्री. गौतम पांगरीकर, मिळंद हायस्कूलचे श्री. गवरे सर, युवा कार्यकर्ते श्री. जयू नारकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे, रामदास पाटील तसेच पत्रकार तुषार पाचलकर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. कमलाकर पाटील म्हणाले, “माझ्या आयुष्यात इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने कोणी वाढदिवस साजरा केला नव्हता.” तसेच त्यांनी सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

