(चिपळूण)
नगरपंचायत निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत ‘एका अक्षरा’ची विसंगती उमेदवारावर गंडांतर ठरल्याची घटना चिपळूणमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या दीक्षा दशरथ कदम यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात नमूद केलेला ‘प्रभाग १ ब’ हा उल्लेख आणि पक्षाच्या एबी फॉर्मवरील ‘प्रभाग १ अ’ असा चुकीचा उल्लेख यांच्या तफावतीमुळे त्यांचा अर्ज छाननीत अपात्र ठरला.
गोवळकोट येथील प्रभाग क्रमांक १ ब मधून निवडणूक लढवणाऱ्या कदम यांनी नामनिर्देशन पत्रात अचूक माहिती भरली होती; मात्र एबी फॉर्मामधील चुकीचा प्रभाग क्रमांक त्यांच्यासाठी धोक्यात आला. निवडणूक नियमांनुसार फॉर्मातील माहिती आणि एबी फॉर्मामधील नोंदीत तफावत राहिल्यास अर्ज अवैध ठरवला जातो. त्यामुळे कदम यांना या टप्प्यावर धक्का बसला.
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या १३ अर्जांपैकी ३ अर्ज छाननीत बाद झाले असून ८ उमेदवारांचे १० अर्ज वैध ठरले आहेत. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म जारी केल्याने मुख्य उमेदवार लियाकत शहा यांना अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही त्यांच्या दुसऱ्या पर्यायी अर्जास वैधता मिळाल्याने ते स्पर्धेत कायम आहेत. नगरसेवक पदासाठी तब्बल १५४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून १४१ अर्ज वैध मानण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाच्या १२९ उमेदवारांमध्ये आता चुरस अधिक रंगणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपर्यंतच्या माघारीच्या अंतिम टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छाननीत बाद ठरलेल्या नगराध्यक्ष पदाच्या अर्जांमध्ये राजेश देवळेकर, विनिता सावर्डेकर आणि लियाकत शहा यांचा समावेश आहे. तिघांनीही दोन-दोन अर्ज दाखल केले असल्याने त्यांचे पर्यायी अर्ज वैध राहिले आहेत. नगरसेवक पदासाठी दीक्षा कदम, दीपक निवाते, मुनीर सहीबोले, अ. कादिर मुकादम, नितीन गोवळकर, सुवर्णा साडविलकर, महंमद पाते, युगंधरा शिंदे, अंकुश आवले आणि सुधीर शिंदे यांचे अर्ज अवैध ठरले असून, बहुतांश उमेदवारांचे दुसरे अर्ज वैध असल्याने ते निवडणूक रिंगणात कायम आहेत.

