(रत्नागिरी)
कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ संस्थेच्या सात सदस्यीय पथकाने अत्यंत प्रतिकूल हवामान आणि खडतर परिस्थितीचा सामना करत समुद्रसपाटीपासून तब्बल ५,३६४ मीटर उंचीवरील ‘एव्हरेस्ट बेस कँप’ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेत रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया सातपुते यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या तसेच ‘मृत्यूचा पर्वत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा पर्वत मोहिमेत यश मिळवणाऱ्या जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक कस्तुरी सावेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.
या मोहिमेसाठी १५ मे रोजी पथक नेपाळची राजधानी काठमांडू येथे दाखल झाले. त्यानंतर जगातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या लुकला विमानतळापर्यंत छोट्या विमानाने प्रवास करून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात करण्यात आली. लुकला – फाकडींग – नामचे बाजार – तेंगबोचे – दिंगबोचे – लोबुचे – गोरक्षेप असा टप्प्याटप्प्याने प्रवास करत अखेर पथकाने एव्हरेस्ट बेस कँप गाठला.
या मोहिमेत चिपळूण येथील बी. के. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते, धाराशिव जिल्ह्यातील उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता तसेच समाजमाध्यम प्रभावक अक्षय आणि नुपूर मठकर यांचाही सहभाग होता.
शनिवार, दि. २३ मे रोजी एव्हरेस्ट बेस कँपवर भारतीय तिरंगा फडकवत आणि भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करत या मोहिमेची अभिमानास्पद सांगता करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान रात्री उणे १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले तापमान, दिवसभरातील कडाक्याची थंडी, जीवघेणा बर्फाळ मार्ग आणि विरळ होत जाणारा ऑक्सिजन यामुळे प्रत्येक टप्पा आव्हानात्मक ठरत होता. विशेषतः लोबुचे ते एव्हरेस्ट बेस कँप हा प्रवास अत्यंत कठीण आणि शारीरिक-मानसिक क्षमतेची खरी कसोटी पाहणारा ठरला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मनोबल, शारीरिक तयारी आणि टीमवर्कच्या जोरावर कोणतेही आव्हान पेलता येते, हा अनुभव या मोहिमेतून पथकाने घेतला.
नेपाळमधील ‘पीक १५ अॅडव्हेंचर’ संस्थेचे शेखर तमांग, योगेंद्र तमांग आणि प्रशांत तमांग यांनी मार्गदर्शक म्हणून मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

