(चिपळूण)
भाजपच्या रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
या प्रवेशामुळे असगोली जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत संतोष जैतापकर हे असगोली गटातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असून, त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
सामाजिक व संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या जैतापकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद वाढेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या घडामोडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना नव्याने वेग आला आहे.

