(चिपळूण)
लेकीचे लग्न ठरणे ही प्रत्येक पित्यासाठी आयुष्यातील सर्वांत आनंदाची घटना असते. चिपळूणमध्येही चार दिवसांपूर्वी मुलीचे लग्न ठरले, मे महिन्यात विवाहाची तारीखही निश्चित झाली आणि घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, लग्नाच्या तयारीला सुरुवात होत असतानाच पित्याचे अचानक निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चिपळूण शहरातील प्रसिद्ध फळविक्रेते, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ चे सभासद तसेच पाग बौद्ध कॉलनी येथील रहिवासी गौतम सीताराम जाधव (वय ६०) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.
गौतम जाधव यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न येत्या १० मे रोजी ठरले होते. अवघ्या चार दिवसांपूर्वीच हे लग्न जुळले होते. घरात आनंद, लग्नाची तयारी आणि भविष्यातील स्वप्ने आकार घेत असतानाच वडिलांचे अचानक जाणे कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी ठरले आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर, हॉटेल आरंभशेजारी अनेक वर्षे फळविक्रीचा व्यवसाय करत गौतम जाधव यांनी प्रामाणिक कष्टांच्या जोरावर आपल्या तिन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. तिन्ही मुली पदवीधर असून, मोठ्या मुलीने फार्मसीची पदवी घेत नवी मुंबई येथे स्वतःचे मेडिकल सुरू केले आहे. दुसऱ्या मुलीच्या विवाहाची तारीख ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण नांदत होते.
गौतम जाधव हे दिवंगत पत्रकार उत्तमकुमार जाधव, हर्षवर्धन गायन पार्टीचे गायक दिवंगत अनंत जाधव आणि चिपळूण नगर परिषद कर्मचारी प्रीतम जाधव यांचे बंधू होत. तसेच हॉटेल आरंभचे मालक हेमंत अनंत जाधव यांचे ते चुलते होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने केवळ जाधव कुटुंबच नव्हे, तर परिसरातील व्यापारी, ग्राहक आणि परिचितांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनमिळाऊ स्वभाव, कष्टाळू वृत्ती आणि कुटुंबासाठी अखंड झटणारा पिता म्हणून गौतम जाधव यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. आनंदाच्या उंबरठ्यावर उभे असलेले घर एका क्षणात शोकसागरात बुडाले असून, मुलीचे लग्न पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

