(चिपळूण /रत्नागिरी)
मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू होताच मुंबई-पुण्यासह राज्यातील विविध भागांतून पर्यटक आणि चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणाकडे धाव घेत आहेत. हिरवाईने नटलेल्या कोकणात पर्यटन बहरत असतानाच दुसरीकडे मात्र सीएनजी गॅसच्या तीव्र तुटवड्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. कोकणभर अनेक सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून “गॅस कधी मिळणार?” या प्रतीक्षेत नागरिकांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईपासून तळकोकणापर्यंत सीएनजी पंपांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले. पर्यावरणपूरक आणि परवडणारा पर्याय म्हणून सीएनजी वाहनांकडे नागरिकांचा कल वाढला. स्थानिक रिक्षाचालक, टुरिस्ट वाहन व्यावसायिक तसेच खासगी वाहनधारक मोठ्या प्रमाणावर सीएनजीचा वापर करू लागले. मात्र गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची संख्या वाढली की सीएनजी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. अनेक ठिकाणी पंप सुरू असले तरी गॅसचा पुरवठाच अपुरा पडत असल्याने वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत वाढत आहेत. परिणामी पर्यटकांचा मौल्यवान वेळ रस्त्यावरच खर्ची पडत असून स्थानिक व्यावसायिकांचाही धंदा ठप्प होण्याची वेळ आली आहे. “धंदा करायचा की गॅससाठी रांगेत उभे राहायचे?” असा संतप्त सवाल रिक्षा आणि टुरिस्ट वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
सीएनजीच्या वाढत्या वापराचा विचार करून सुट्टीच्या आणि सणासुदीच्या काळात पुरवठ्याचे विशेष नियोजन करणे अपेक्षित असताना प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गणेशोत्सव, शिमगा आणि मे सुट्ट्यांच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार हे आधीच निश्चित असतानाही पुरवठा व्यवस्थेत आवश्यक वाढ का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोकणातून राज्य आणि केंद्र स्तरावर प्रभावी नेतृत्व करणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोकणवासीयांकडून होत आहे. “लोकं उन्हात तासनतास रांगेत उभी आहेत; मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना याचे काहीच सोयरसुतक नाही,” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
कोकणचा पर्यटन विकास करायचा असेल, तर पायाभूत सुविधाही सक्षम कराव्या लागतील. अन्यथा सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होईल आणि स्थानिकांमध्येही तीव्र नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात कोकणासाठी अतिरिक्त सीएनजी पुरवठा उपलब्ध करून देत कायमस्वरूपी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

