( बारामती )
बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी उसळलेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी किमान 15 नागरिकांचे सुमारे 20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीची कारवाई करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
29 जानेवारी रोजी झालेल्या अंत्यसंस्कारासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय बारामतीत उपस्थित होता. या गर्दीत काही चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, मंगळसूत्र तसेच इतर मौल्यवान दागिने हिसकावल्याचे प्रकार घडले. अचानक झालेल्या चोरीमुळे अंत्यविधीच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, जागरूक नागरिकांनी काही चोरट्यांना रंगेहात पकडत त्यांना रोखले. संतप्त नागरिकांनी त्यांना पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले. याशिवाय पोलिसांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्काळ कारवाई करत काही आरोपींना अटक केली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आणखी काही चोरट्यांचा शोध सुरू आहे. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांनी अधिक सावध राहावे आणि मौल्यवान दागिने घालणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शोकाकुल वातावरणात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, अंत्यविधीसारख्या कार्यक्रमातही गुन्हेगारी घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

