( मुंबई )
राज्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमधून घेतलेल्या ९७९ औषधांच्या नमुन्यांपैकी ११ औषधांमध्ये मूळ घटकच आढळले नाहीत. यामुळे संबंधित ११ वितरक कंपन्यांचे औषध वितरणात बनावटपणाचे सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या परवाने तत्काळ रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच खासगी रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांमार्फत कमी गुणवत्तेची औषधे पुरवली जात असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. औषधांच्या पॅकिंगवर नमूद केलेल्या घटकांच्या तुलनेत प्रत्यक्षात औषधांमध्ये आवश्यक प्रमाणात घटक नसल्याची गंभीर बाब त्यांनी उपस्थित केली.
या चर्चेत आमदार अरुण लाड व सदाशिव खोत यांनीही सहभाग घेतला. यावर उत्तर देताना मंत्री झिरवाळ म्हणाले की, औषध विक्रेत्यांमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या औषधांतील घटकांची शहानिशा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहील. समितीच्या अहवालानंतर दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात बनावट औषधांच्या विक्रीविरोधात हे पाऊल महत्त्वाचे असून, रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही आवश्यक असल्याचेही झिरवाळ यांनी अधोरेखित केले.