(मुंबई)
राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करत शिक्षण विभागाने 26 जानेवारी 2026 पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची नवी पद्धत लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांनी स्वतंत्र कार्यक्रम न करता एकत्रित स्वरूपात सामूहिक शारीरिक कवायतींचे आयोजन करावे, असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या व्यापक उपक्रमात राज्यातील सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत बहुतेक शाळांमध्ये शाळेच्या आवारात झेंडावंदन, एनसीसी, स्काऊट-गाईड संचलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, यंदापासून हा पारंपरिक ढाचा बदलून विद्यार्थ्यांना एका ठिकाणी एकत्र आणून सामूहिक कवायती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी शिक्षण संचालनालयाने 14 मिनिटांचा देशभक्तीपर गीतांचा विशेष व्हिडीओ तयार केला असून, त्याच्या तालावर आणि सूचनांनुसार विद्यार्थ्यांना शारीरिक कवायती कराव्या लागणार आहेत.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी दर शुक्रवार व शनिवारी कवायतींचा सराव घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. यासाठी शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक आणि केंद्रप्रमुख यांच्यावरही विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील किती शाळा सहभागी होतील, किती विद्यार्थी एकत्र येतील, कोणते मैदान निवडले जाईल, मैदानाची क्षमता किती आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, 26 जानेवारी 2026 पासून पुढील प्रत्येक वर्षी याच पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार असल्याचेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या उपक्रमात विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात राज्यातील एक लाखांहून अधिक शाळा, सात लाखांपेक्षा अधिक शिक्षक आणि दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असून, हा उपक्रम राज्यातील शालेय शिक्षणाच्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि महत्त्वाचा उपक्रम ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

