(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वेळेत उपलब्ध नसल्याने सर्पदंश झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी जोरदार संताप व्यक्त केला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी 24 तास डॉक्टर उपलब्ध ठेवण्याची मागणी केली आहे.
ताम्हाणे कुळयेवाडी येथील अनुसया शिगवण (वय 85) या रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घराजवळील लाकडाच्या खोपीतून सरपण काढत असताना विषारी सर्पाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर सेवेत असलेले डॉक्टर उपस्थित नसल्याने महिलेवर तातडीने उपचार सुरू होऊ शकले नाहीत, असा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला आहे. काही वेळानंतर ड्युटी संपवून गेलेले डॉ. यादव रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी तपासणी सुरू केली. परंतु तोपर्यंत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव रविवारी देवरुख ग्रामीण रुग्णालयात पुन्हा समोर आले. सर्पदंश झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर वेळेत उपचारच न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने गंभीर अवस्थेतील महिलेची तब्बल काही काळ उपचाराविना तडफड सुरू होती. या संतापजनक प्रकारामुळे ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आरडाओरड केली.
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे-कुळयेवाडी येथील अनुसया शिगवण (वय ८५) या रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घराशेजारील लाकडाच्या खोपीतून सरपण काढत असताना विषारी सर्पाने त्यांच्या हाताला दंश केला. घटनेनंतर घाबरलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात आणले. सायंकाळी सुमारे ४.१५ वाजता त्या रुग्णालयात दाखल झाल्या; मात्र त्यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गंभीर अवस्थेतील वृद्ध महिला उपचाराच्या प्रतीक्षेत असताना नातेवाईक आणि ग्रामस्थांची धावपळ सुरू होती. मात्र ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढेपाळलेली दिसून आली. “डॉक्टर नाहीत, थांबा,” एवढेच उत्तर मिळत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. दरम्यान, ड्युटी संपवून गेलेले डॉ. यादव यांना पुन्हा रुग्णालयात बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी सुरू केली; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचार सुरू होण्यापूर्वीच अनुसया शिगवण यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. “ग्रामीण भागातील नागरिकांनी नेमके कोणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे एका वृद्धेला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत प्रशासनावर निष्क्रियतेचे ताशेरे ओढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक जाधव हे सहकाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सायंकाळी उशिरा शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, सर्पदंश झालेल्या वृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे, ड्युटीच्या वेळी अनुपस्थित असलेल्या संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार? ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, की रुग्णालयात डॉक्टर नसतानाही व्यवस्था निर्धास्त राहणार? “डॉक्टर उपलब्ध नव्हते” हे कारण आता जनतेला मान्य नसून या गंभीर प्रकारात जबाबदारी निश्चित करून निलंबनासह कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कोणती भूमिका घेणार?
या घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक जगताप यांच्याकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे. केवळ चौकशीचे आदेश देऊन प्रशासन आपली जबाबदारी झटकणार की प्रत्यक्ष दोषींवर कारवाई होणार, हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याची बाब अत्यंत गंभीर मानली जात असून ड्युटी रोस्टर, आपत्कालीन सेवा आणि रुग्ण व्यवस्थापनाचा संपूर्ण आढावा घेण्याची मागणी होत आहे. एका महिलेचा जीव गेल्यानंतर तरी आरोग्य यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.
रुग्णालयात तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप
घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. परिस्थिती चिघळू नये म्हणून उपनिरीक्षक जाधव पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर “रुग्णालयात 24 तास डॉक्टर उपस्थित असलेच पाहिजेत” अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे आवश्यक असून आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणामुळे एका वृद्धेला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे देवरुख ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून याबाबत चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

