(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखची सुकन्या दक्षता दीपक लिंगायत हिने दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या G-20 गोलमेज परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठसा उमटवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण कोकणासह देशाचेही नाव उज्वल केले आहे.
जगातील प्रमुख २० अर्थव्यवस्थांच्या ‘जी-20’ समूहामार्फत आयोजित या परिषदेत जागतिक आर्थिक सहकार्य, अन्न व ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले. भारतासह अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, दक्षिण आफ्रिका अशा नामवंत देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
या मंचावर दक्षता लिंगायत हिने भारताचे प्रतिनिधित्व करत विकसनशील देशांच्या गरजांवर प्रभावीपणे भाष्य केले. तिच्या अभ्यासपूर्ण विचारांना परिषदेत विशेष दाद मिळाली.
शैक्षणिक व सामाजिक प्रवास
दक्षताचे मूळगाव मठ धामापूर (ता. संगमेश्वर) असून तिचे वडील दीपक लिंगायत हे देवरुखमधील केशवसृष्टी येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. प्राथमिक शिक्षण देवरुख शाळा क्र. ४, पुढील शिक्षण साडवलीच्या मिनाताई ठाकरे विद्यालय व देवरुखमधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात झाले. फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून तिने अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून विशेष पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या गुणवैशिष्ट्यांची दखल घेत तिला दिल्ली येथील IIT शैक्षणिक प्रकल्पासाठी निवडण्यात आले. सध्या ती असोसिएट ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहे.
कला, साहित्य आणि जादूतील चमक
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच दक्षता लिंगायत हिचा साहित्य आणि जादूच्या प्रयोगांवर विशेष प्रेम आहे. वयाच्या १२ व्या वर्षी तिने अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन, जागतिक बाल साहित्य संमेलन आणि कोकण विभागीय युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. १०० हून अधिक जादूचे प्रयोग सादर करून रसिकांची वाहवा मिळवलेली आहे. विशेष म्हणजे, भारताच्या सर्वोत्कृष्ट स्पीड स्पीच जादूगार म्हणूनही तिचा सन्मान करण्यात आला आहे. उत्कृष्ट वक्तृत्व, प्रभावी विचार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दक्षता लिंगायत हिची ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.