(देवळे / प्रकाश चाळके)
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती, कसबा-संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्वराज्य किल्ले व भव्य मुद्रा भिंतीचित्र स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी-शिवणे येथील विद्यार्थी आणि कला शिक्षकांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
कसबा-संगमेश्वर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये आकर्षक आणि ऐतिहासिक किल्ल्यांची उत्कृष्ट प्रतिकृती साकारत परीक्षकांची वाहवा मिळवली.
स्वराज्य किल्ले बनविणे स्पर्धेच्या प्रथम गटात ‘सिंधुदुर्ग किल्ला’ साकारत ओंकार सखाराम रामाणे, वेदांत रमेश घडशी (इयत्ता १० वी) आणि सार्थक संतोष बेटके (इयत्ता ९ वी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय गटात ‘रायगड किल्ला’ सादर करणाऱ्या सार्थक सखाराम रामाणे, त्रिवेश राजाराम बाचम आणि अब्दुल हकीम दावलसाहेब शेख (इयत्ता ९ वी) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या गटाला रोख ४ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तृतीय गटात ‘पन्हाळा किल्ला’ सादर करणाऱ्या मानस विलास घडशी, श्लोक शशिकांत घडशी आणि रुद्र संतोष चव्हाण (इयत्ता ८ वी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तर खुल्या गटात ‘जंजिरा किल्ला’ सादर करणाऱ्या स्वस्य उदय भुरवणे, सोहम सचिन भुरवणे, स्वरा राजेंद्र बाईत आणि सावी जितेंद्र बाईत यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.
दरम्यान, विद्यालयाचे कला शिक्षक प्रदीप कृष्णा शिवगण यांनी साकारलेल्या ‘चुकीला माफी नाही’ या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित भव्य मुद्रा भिंतीचित्राने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या प्रभावी कलाकृतीला प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय, महाराष्ट्रातील पर्यटन, संत परंपरा, कला आणि व्यवसाय या विषयांवरील त्यांच्या चित्रांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाडीक, माजी आमदार सुभाष बने, संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण तसेच डी-कॅड कॉलेज, देवरुखचे प्राचार्य रणजीत मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि कला शिक्षकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

