(मुंबई)
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे मंत्री व शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात शरण आले आहेत. २ डिसेंबर २०२५ रोजी दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यानंतर ते फरार होते. दीड महिन्यांच्या कालावधीनंतर, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारल्यानंतरच त्यांनी पोलिसांसमोर हजेरी लावली.
विकास गोगावले महाड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित असून, पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नगरपालिका निवडणूक राडा प्रकरण
२ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना महाड शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. या गोंधळात विकास गोगावले यांनी विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा तसेच रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.
हायकोर्टाचा सरकारला जाब
विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व पोलिस प्रशासनाला खडेबोल सुनावले. “मंत्र्यांची मुले गुन्हे करूनही मोकाट फिरतात. सरकारने ठरवले तर कोणालाही २४ तासांत अटक होऊ शकते,” अशा शब्दांत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने विकास गोगावले यांना आज सकाळी ११ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशापूर्वीच त्यांनी महाड पोलिसांकडे हजेरी लावली.
इतर आरोपी आधीच शरण
या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले, विजय मालुसरे, धनंजय मालुसरे, प्रशांत शेलार, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ असे एकूण आठ आरोपी यापूर्वीच पोलिसांसमोर शरण आले आहेत. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाड पोलीस ठाण्याच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

