( मुंबई )
महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी हा दूरदर्शी निर्णय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील चारही प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालये समाजातील विशेषतः वंचित घटकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरवत आहेत. बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवांद्वारे हजारो रुग्णांवर उपचार केले जात असून या रुग्णालयांमध्ये सुमारे 5700 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. या मजबूत पायाभूत सुविधांच्या आधारे आता या रुग्णालयांचे ‘टीचिंग इन्स्टिट्यूट’मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ वाढणार
केंद्र शासनाच्या ‘मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम’ अंतर्गत मानसिक आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत (NMHP) मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे.
राज्य शासनाने 16 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णय जारी करून एमडी सायकिअॅट्री, एम.फिल क्लिनिकल सायकॉलॉजी, एम.फिल सायकियाट्रिक सोशल वर्क आणि डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग या अभ्यासक्रमांना मान्यता दिली होती.
नागपूरमध्ये एमडी सायकिअॅट्री अभ्यासक्रम सुरू
प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालय नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून एमडी सायकिअॅट्री अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने 2022-23 पासून हा अभ्यासक्रम सुरू असून दरवर्षी 4 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. आतापर्यंत 12 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यापैकी 2 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
ठाणे आणि पुण्यात सायकियाट्रिक नर्सिंग डिप्लोमा
प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालय ठाणे आणि पुणे येथे 2022-23 पासून डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून आतापर्यंत ठाणे येथून 59 आणि पुणे येथून 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या निर्णयामुळे काय होणार फायदे?
- मानसिक रुग्णांना अधिक दर्जेदार आणि विशेषज्ञ उपचार सेवा मिळणार
- प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या वाढणार
- मानसिक आरोग्य क्षेत्रात संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळणार
- ग्रामीण आणि वंचित भागांपर्यंत आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचणार
- राज्यातील मानसिक आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ आरोग्य क्षेत्रापुरता मर्यादित नसून शिक्षण, संशोधन आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून राबवण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील मानसिक आरोग्य सेवांसाठी गेमचेंजर ठरेल.

