(कोल्हापूर)
खेळण्या-बागडण्याच्या वयात कराटेच्या कठोर सरावात रममाण होत इचलकरंजीतील प्रिशा कश्यप पटेल हिने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या 6 वर्षांच्या वयात ब्लॅक बेल्ट मिळवत तिने India Book of Records 2026 मध्ये देशातील सर्वात कमी वयाची ब्लॅक बेल्ट धारक म्हणून अधिकृत नोंद मिळवली आहे. या अभूतपूर्व यशामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रिशाच्या यशामागे तिची जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत आणि कुटुंबाचा ठाम पाठिंबा हे महत्त्वाचे घटक ठरले. वडील कश्यप पटेल यांनी स्वतः लहानपणी कराटेचे धडे घेतले होते, मात्र शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. पुढे त्यांनी मोठी मुलगी ध्रुवांशीला इचलकरंजी अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमीत प्रशिक्षणासाठी पाठवले. बहिणीचा सराव पाहून प्रिशाला कराटेची आवड निर्माण झाली आणि तिनेही प्रशिक्षण घेण्याचा हट्ट धरला. आई जालपा पटेल यांनीही तिला सतत प्रोत्साहन दिले, ज्यामुळे तिची प्रगती झपाट्याने झाली.
अतिशय कमी वयातच प्रिशाने कराटेतील प्राथमिक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले. यलो, ऑरेंज, ग्रीन आणि ब्ल्यू बेल्ट सहज पार करत तिने पुढे सिनीअर गटातील पर्पल आणि ब्राऊन बेल्टसाठी विशेष सराव शिबिरात सहभाग घेतला. कठोर मेहनत आणि नियमित सरावाच्या जोरावर प्रत्येक परीक्षा ती उत्तीर्ण होत गेली. मे 2025 मध्ये झालेल्या ब्लॅक बेल्ट उच्च पदवी परीक्षेसाठी तिची निवड झाली आणि सलग दहा दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत तिने आत्मविश्वासाने परीक्षा दिली. शिस्तबद्ध कामगिरीमुळे तिने हा मान पटकावला.
या यशामागे प्रशिक्षिका किरण चौगुले आणि ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. प्रिशा ज्या अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे, ती अकॅडमी गेल्या 35 वर्षांपासून कार्यरत असून आतापर्यंत जवळपास 200 ब्लॅक बेल्ट तयार झाले आहेत. त्या अकॅडमीत प्रिशाने सर्वात कमी वयाचा विक्रम नोंदवला आहे.
तिळवणी येथील रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या प्रिशाला शाळेकडूनही सातत्याने प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य पद्मश्री पुरंत, उपप्राचार्य सागर गिरीगोसावी आणि क्रीडा शिक्षक विनायक सुतार यांनी तिच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रिशाच्या या यशामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजीचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले असून अनेक लहान मुलांसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे. तिची मेहनत आणि आत्मविश्वास पाहता, भविष्यात ती आणखी मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

