( देवगड )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील चार युवकांपैकी एक जण समुद्रात बुडाला, तर तिघांना स्थानिक मच्छिमारांनी जीवाची बाजी लावत वाचवले. चैतन्य राजेंद्र गुरव (वय २२, रा. दादर-नायगाव, मुंबई) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सोहम जयेश मंडोद (वय २०) याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुट्टीसाठी मुंबईहून देवगडमध्ये आलेल्या पाच मित्रांनी मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनाऱ्यावर भेट दिली होती. यातील यश राजेंद्र उपरकर हा किनाऱ्यावर थांबला होता, तर उर्वरित चौघे जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि समुद्राचा अंदाज न आल्याने चारही युवक अचानक बुडू लागले.
मच्छिमार देवदूत ठरले; तिघांचे जीव वाचले
युवकांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केल्यानंतर स्थानिक मच्छिमार रमेश मनोहर तारी, लक्ष्मण मनोहर तारी, मनीष रमेश तारी, बाबूराव धुरी आणि बाळा राजम यांनी तत्काळ समुद्रात धाव घेतली. बाबूराव धुरी आणि बाळा राजम यांनी नौकेच्या सहाय्याने समुद्रात प्रवेश करत बुडणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओम चव्हाण, सोहम मंडोद, अर्णव तारी यांना वाचवून किनाऱ्यावर आणले. यातील सोहम मंडोद हा बेशुध्द अवस्थेत असल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याला शुध्दीवर आणण्यात आले. परंतू या दरम्यान चैतन्य गुरव हा पाण्यात दिसेनासा झाला. यावेळी स्थानिक मच्छिमारांना नौकांच्या सहाय्याने पाण्यात त्याचा शोध घेतला परंतू सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडला नाही.
मच्छिमार बांधवांच्या धाडसी प्रयत्नांमुळे ओम दीपक चव्हाण (१७), सोहम मंडोद आणि अर्णव राजेश तारी (२०) यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, चैतन्य गुरव हा दरम्यान समुद्रात बेपत्ता झाला. स्थानिक मच्छिमारांनी सायंकाळपर्यंत नौकांच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली, परंतु त्याचा शोध लागू शकला नाही.
“समुद्रात उतरू नका सांगितलं होतं…”
या घटनेनंतर यश उपरकर याने भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले, “सुट्टी एन्जॉय करण्यासाठी माझे मित्र मुंबईहून गावी आले होते. मी त्यांना समुद्रात उतरू नका असा वारंवार सल्ला देत होतो. पण त्यांनी तो ऐकला नाही आणि ही दुर्दैवी घटना घडली.”
स्थानिकांच्या माहितीनुसार, चैतन्य गुरव याला पोहता येत होते. मात्र, समुद्रातील प्रवाह आणि खोलीचा चुकीचा अंदाज आल्याने तो पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, या घटनेमुळे देवगड किनारपट्टीवरील पर्यटक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रविवारी समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी असतानाही तेथे कोणताही सुरक्षारक्षक किंवा लाइफगार्ड तैनात नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे युवक मदतीसाठी आर्त हाक देत असताना अनेक पर्यटक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिक मच्छिमारांनी वेळीच धाव घेतली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे पर्यटनस्थळी सुरक्षाव्यवस्था, इशारा फलक आणि प्रशिक्षित लाइफगार्ड नियुक्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

