(मुंबई)
राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगार प्रक्रियेत मोठा डिजिटल बदल करण्यात येत आहे. यापुढे सर्व पगारबिले कोषागार कार्यालयाला पूर्णपणे पेपरलेस आणि ऑनलाइन पद्धतीने पाठवावी लागणार आहेत. या नव्या प्रणालीची अंमलबजावणी मे महिन्यापासून सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात १९० कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची पगारबिले ऑनलाइन पाठवली जाणार आहेत.
यानंतर वन, महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम (PWD) आणि जलसंपदा या मोठ्या विभागांचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला बँक खात्याची ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती कोषागार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य सरकारच्या सुमारे १७ लाख कर्मचारी आणि निवृत्तीधारकांच्या वेतन-पेन्शनसाठी दरमहा सुमारे ९,५०० ते १०,००० कोटी रुपयांचा खर्च होतो. सध्या काही विभागांमध्ये मंजूर पदांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने पगार दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच, मंजूर आणि कार्यरत पदांची एकत्रित माहिती उपलब्ध नसल्यामुळे ही विसंगती लक्षात येत नव्हती. ही समस्या दूर करण्यासाठी ‘नवीन सेवार्थ’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक विभागातील मंजूर आणि कार्यरत पदांची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याची नोंदणी करूनच पगार प्रक्रिया केली जाईल.
पेपरलेस पगारबिलामुळे काय बदलणार?
सध्या पगारबिलांसाठी दरमहा सुमारे ३० पोती कागद वापरले जातात. ही कागदपत्रे कोषागार कार्यालयात पाठवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष जावे लागते. मात्र, नवीन प्रणालीमुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होणार असून, वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. पुणे येथील वित्त विभागाच्या सहसंचालिका भारती देशमुख यांनी डीडीओ (Drawing and Disbursing Officers) अधिकाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण दिले आहे.
‘जीआर’नुसारच पगार वितरण
शासन निर्णयानुसार, प्रत्येक विभागात मंजूर पदांनुसारच कर्मचाऱ्यांना पगार दिला जाईल. ‘नवीन सेवार्थ’ प्रणालीमुळे पदभरती आणि मंजुरीची पडताळणी होणार आहे. त्यामुळे अनावश्यक कर्मचाऱ्यांना पगार देण्याचे प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.
‘ओटीपी’वर आधारित सुरक्षित पगार प्रक्रिया
नवीन प्रणालीत प्रत्येक डीडीओ अधिकाऱ्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. पगारबिल सबमिट करताना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतरच पगारबिल कोषागार कार्यालयाकडे पाठवले जाईल. या प्रक्रियेनंतर सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ठरलेल्या तारखेला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

