(कोल्हापूर)
फुलेवाडी येथे बांधकामाधीन महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचा स्लॅब मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला, यामुळे घटनास्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी तो कोसळला. त्यामध्ये काम करणारे अनेक मजूर अडकले गेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी ७ जण स्लॅबखाली अडकले होते, काहींना तातडीने बाहेर काढण्यात आले. यामध्ये १ जण किरकोळ जखमी आहे, ५ जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र, एका कामगाराचा मृत्यू झाला. अडीच तास बचावकार्य चालू होतं. जखमी कामगारांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या दुर्घटनेत नवनाथ आण्णाप्पा कागलकर (वय 38 रा शाहूनगर वडवाडी) असं मयत कामगाराचं नाव आहे. तर अक्षय पिराजी लाड (वय 30 रा शिवशक्ती कॉलनी गंगाई लॉन), दत्तात्रय सुभाष शेंबडे (वय 37), जया सुभाष शेंबडे (वय 56 राहणार. छत्रपती. संभाजीनगर), वनिता बापू गायकवाड (वय 40 राहणार छत्रपती संभाजीनगर) आणि सुमन सदा वाघमारे (वय 60 रा. छत्रपती संभाजीनगर) अशी जखमींची नावं आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजू लक्ष्मी तसेच माजी आमदार ऋतुराज पाटील घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याबाबत सूचना दिल्या.
संपूर्ण बचावकार्यात अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस तैनात होते. जखमींना तातडीने रुग्णवाहिकांमार्फत रुग्णालयात हलवण्यात आले, तर घटनास्थळी लोकांच्या गर्दीमुळे मदतकार्याला काहीसा अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या.
या नूतन इमारतीच्या स्लॅबखाली अडकलेल्या पाच जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले असून मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरु होते. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली का याची चौकशी करण्यात येणार आहे. सध्या आम्ही ढिगाऱ्याखाली आणखी कोण अडकले का त्यांना वाचवण्याला प्राधान्य देत आहोत, अशी माहिती आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही आयुक्तांनी दिले.

