(मुंबई)
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. “गोमातेची तस्करी आणि अवैध कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. 25 मे ते 28 मे 2026 या कालावधीत युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि वाहतूक यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
राज्यभर विशेष नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी
परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार असून आवश्यक परवानग्या, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का याची पडताळणी केली जाईल.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. नियमबाह्य पद्धतीने जनावरांची वाहतूक करणारी वाहने थेट जप्त करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
‘गोमाता संरक्षण हा श्रद्धा आणि संस्कृतीचा विषय’
प्रताप सरनाईक म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याने देशी गाईला ‘राज्यमाता’चा दर्जा दिला आहे. हिंदू समाजासाठी गोमाता हा श्रद्धा, संस्कृती आणि अस्मितेचा विषय आहे. अशा पवित्र गोमातेची कत्तल करून अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “विशिष्ट सणांच्या काळात गोतस्करीचे प्रकार वाढतात. गोवंशाला कोंबून, उपाशी ठेवून आणि अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते. हा केवळ कायद्याचा भंग नाही, तर समाजाच्या श्रद्धांवर घाला आहे. अशा गोतस्करांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.”
पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा संस्थांचा समन्वय
या विशेष मोहिमेत परिवहन विभागासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग तसेच विविध गोसेवा आणि प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे. अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.
“गोमाता संरक्षण हा केवळ कायद्याचा विषय नसून हिंदुत्वाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मुक्या जनावरांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात सरकार झुकणार नाही. राज्य सरकार गोसंरक्षणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असेही सरनाईक यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व कारवाईचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

