(मुंबई)
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी अंतिम करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतरच ती जाहीर करण्याचा गंभीर विचार प्रदेश भाजप करत असल्याची चर्चा आहे. पक्षातील संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी हा उपाय आखल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे.
उमेदवार निवडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिवसभर सलग बैठकांद्वारे चर्चा केली. काही वरिष्ठ नेत्यांशीही सल्लामसलत झाली.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या माहितीनुसार, ८० टक्के नावे अंतिम झाली असून उर्वरित २० टक्के नावे उद्यापर्यंत निश्चित होतील. उद्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण यादी तयार होईल.
परंतु, यादी लवकर जाहीर झाल्यास नाराज कार्यकर्त्यांमुळे बंडखोरी उसळण्याची शक्यता असल्याने प्रदेश स्तरावर घोषणा न करता, जिल्हा प्रभार्यांकडे आधीच पाठवलेल्या बी-फॉर्मद्वारेच उमेदवार अर्ज भरतील अशी रणनीती आखण्यात आल्याचे समजते. म्हणजेच, ज्यांना उमेदवारी मंजूर असेल, त्या उमेदवारांपर्यंत बी-फॉर्म जिल्हा प्रभारी स्वतः पोहोचवतील आणि ते थेट अर्ज दाखल करतील.
सूत्रांच्या मते, १७ नोव्हेंबरच्या आत बहुतांश ठिकाणी बंडखोरीचे संकेत शांत राहिल्यास यादी मुदतपूर्वी जाहीर केली जाऊ शकते. अन्यथा, अर्जाची वेळ संपल्यानंतरच यादी जाहीर करण्याचा पर्याय वापरला जाईल.
दरम्यान, काही जिल्ह्यांकडून अद्याप प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तीन संभाव्य उमेदवारांची यादी पाठवली गेली नसल्याने, मुख्यमंत्र्यांनी “नावे तत्काळ पाठवा, घोळ घालू नका” अशी त्या जिल्ह्यांच्या अध्यक्ष व प्रभार्यांना स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती आहे. दरम्यान, महायुतीच्या समन्वय समितीची संयुक्त पत्रकार परिषद १८ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे.

