(नवी दिल्ली)
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे वर्तमानपत्राच्या कागदावर गरम किंवा तेलकट पदार्थ वाढणाऱ्या आणि पार्सल देणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मिठाई, भजी, वडापाव, समोसे तसेच इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात देणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
FSSAI च्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये घातक रसायने आणि जड धातूंचे अंश असतात. गरम किंवा तेलकट पदार्थ थेट वर्तमानपत्राच्या संपर्कात आल्यास ही रसायने अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा प्रकारचे अन्न सेवन केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
तसेच या रसायनांचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शरीरातील हार्मोन्सच्या कार्यात बिघाड होण्याची शक्यता असून, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ॲलर्जी, श्वसनाचे विकार आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
FSSAI ने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वर्तमानपत्र हे वाचण्यासाठी आहे, अन्न वाढण्यासाठी नाही.” त्यामुळे सर्व खाद्यविक्रेत्यांनी अन्नासाठी फूड-ग्रेड कागद, पॅकेजिंग साहित्य किंवा सुरक्षित कंटेनरचाच वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनीही अशा प्रकारे वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिले जात असल्यास त्याला विरोध करून सुरक्षित पॅकेजिंगची मागणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

