(कोल्हापूर)
पितृपक्षानंतर सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. कोल्हापूरातील आंबाबाई मंदिरासह विविध देवी मंदिरांमध्ये भक्तगणांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील प्रसिद्ध बाळूमामा मंदिर स्वच्छता आणि देखभालीसाठी चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
मंदिर बंद राहण्याची तारीख
- शनिवार, 13 सप्टेंबर ते मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
या काळात फक्त मुख्य मंदिरच नव्हे तर भक्तनिवास आणि अन्नछत्रही बंद राहणार आहेत. त्यामुळे या दिवसांत दर्शनासाठी येण्याचा विचार करणाऱ्या भाविकांनी आपला प्लॅन रद्द करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मंदिर प्रशासनाच्या निवेदनानुसार, परिसराची स्वच्छता, आवश्यक देखभाल कामे आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही माहिती वेळेत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, भाविकांना समसमान वागणूक देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच बाळूमामा मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचा विचार करून हा निर्णय स्वागतार्ह ठरला आहे.

