(रत्नागिरी)
भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे), स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कृत्रिम पाय व हात मोजमाप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील १७५ हून अधिक दिव्यांगांनी सहभाग नोंदवला.
शिबिरामध्ये दिव्यांगांच्या हात व पायांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप घेऊन त्यांचे मोल्ड तयार करण्यात आले. पुढील महिन्यात या लाभार्थ्यांना अत्याधुनिक ‘मॉड्यूलर’ कृत्रिम पाय व हात वितरित करण्यात येणार आहेत. वजनाने हलके, ऑटोफोल्ड सुविधायुक्त हे कृत्रिम अवयव वापरल्यानंतर व्यक्ती सहजपणे चालणे, धावणे, पोहणे, वाहन चालवणे तसेच शेतीसारखी कष्टाची कामेदेखील करू शकणार आहे.
उद्घाटनप्रसंगी स्कॉनचे ज्येष्ठ संचालक सतीश चव्हाण, संचालक महेश मायदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक अप्पासाहेब पराडकर, भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर, विश्वस्त राजशेखर अभ्यंकर, बांधकाम व्यावसायिक अनिल चन्ने, रोटरी क्लब स्कॉन प्रोच्या सचिव अपूर्वा ब्राह्मणे तसेच कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहुल पुरकर उपस्थित होते. शिबिराचे समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना विनय खटावकर म्हणाले, “दिव्यांग म्हणजे परमेश्वराचे रूप आहे. त्यांच्या सेवेतून आम्ही नारायण सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, पुढील महिन्यात लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांचे वितरण करण्यात येईल. स्कॉन प्रो फाउंडेशनने CSR निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे करता आले. आज शिबिरात सहभागी होऊ न शकलेल्या दिव्यांगांनी पुढील सहा महिन्यांत पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा.”
महेश मायदेव यांनी सांगितले की, “कोकण दिव्यांगमुक्त व्हावे, ही स्कॉन प्रोजेक्टचे संस्थापक नीलेश चव्हाण यांची संकल्पना आहे. मार्गताम्हाणे (गुहागर) गावचे सुपुत्र असलेल्या श्री. चव्हाण यांच्या प्रेरणेतून आम्ही सलग चौथ्या वर्षी हे शिबिर आयोजित केले आहे. दिव्यांगांच्या सेवेसाठी आमचा हा प्रयत्न सातत्याने सुरू राहील.”
शिबिरस्थळी दिव्यांग आणि त्यांच्या सोबत आलेल्या
नातेवाईकांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांगांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण शिबिराचे सुनियोजित नियोजन करण्यात आले होते. नोंदणी प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांचे मोजमाप घेण्यात येत होते. या उपक्रमासाठी भारत विकास परिषद, स्कॉन प्रो फाउंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

