(रत्नागिरी)
संस्कृत ही भारतीय भाषांची मूळ जननी असल्यामुळे प्रथम संस्कृतमधील संकल्पना स्पष्ट केल्यास त्या इतर भाषांमध्ये अधिक अचूक व सुलभपणे मांडता येतात असे गौरवोद्गार वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय) भारत सरकार से सहाय्यक निदेशक डॉ. शहजाद अंसारी यांनी काढले.
ते वैज्ञानिक तथा तकनीकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय) भारत सरकार आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “Learner’s Glossary of Knowledge Traditions & Practices of India (Sanskrit–Marathi)” या पाच दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यशाळेचा शुभारंभ रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात झाला.
यावेळी डॉ. अंसारी म्हणाले की,प्रादेशिक भाषांमध्ये तांत्रिक शब्दनिर्मितीचे कार्य नियोजित पद्धतीने राबवले जात असून, या माध्यमातून भारतीय ज्ञानपरंपरेचे शास्त्रीय व सुसंगत दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान
यापूर्वी हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये शब्दनिर्मितीचे कार्य झाले असले, तरी नव्या सिद्धांतानुसार संस्कृतला केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे विविध भारतीय भाषांमध्ये एकसंध व प्रमाणित परिभाषा विकसित होण्यास मदत होत आहे. असे ते म्हणाले.
यावेळी पुणे येथील डॉ. संजय गायकवाड यांनी कार्यशाळेची कालपरत्वे वाढणारी उपयोगिता व प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी आयोगाचे काम कसे चालते यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकात रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठेयांनी संस्कृत भाषेची उपयोगिता अधोरेखित करतानाच संस्कृत भाषेमध्ये असलेले शब्द वैविध्य स्पष्ट केले.
दरम्यान या कार्यशाळेमध्ये सुमारे २४०० परिभाषिक शब्दांवर सखोल चर्चा व निर्मितीकार्य सुरू असून, हे सर्व शब्द भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) शी संबंधित आहेत. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, आयुर्वेद, योग, गणित, कला इत्यादी ४० हून अधिक विषयांचा या शब्दावलीमध्ये समावेश आहे. उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातील डॉ. निधी पटवर्धन, संस्कृत विभागातील प्रा. प्रज्ञा भट, संस्कृत अभ्यासिका अक्षया भागवत, बेंगळुरू येथील अगस्त्य गुरुकुलातील सहाय्यक आचार्या प्रा. पूर्वा चुनेकर, रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, प्रकल्प सहाय्यक व संशोधिका प्रा. सई ओक, मुक्त व दूरस्थ अध्ययन केंद्राचे समन्वयक स्वरूप काणे यांच्या एकत्रित सहकार्याने आणि चर्चांमधून प्रत्येक संज्ञेचा अर्थ, संदर्भ व उपयोग यांचा बारकाईने ऊहापोह केला जात आहे.
IKS क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, संशोधक व अभ्यासकांसाठी हा परिभाषा कोश मार्गदर्शक ठरणार असून, भारतीय ज्ञानपरंपरेचे सुलभीकरण व आधुनिक संदर्भात पुनर्स्थापन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या कार्यशाळेमुळे संस्कृत आणि मराठी भाषांमधील ज्ञानसेतू अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे.

