(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील चंपक मैदान परिसरात पारंपरिक बकरा मंडी रंगू लागली असून, विविध जातींच्या देखण्या, रुबाबदार आणि बलदंड बकऱ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडीत मोठ्या प्रमाणावर बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून, खरेदीदारांची गर्दी वाढू लागली आहे.
विशेष म्हणजे, मंडीत काही बकऱ्यांच्या किंमती लाखोंच्या घरात पोहोचल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आकर्षक बांधा, उंची, वजन, देखभाल आणि जातींची वैशिष्ट्ये यामुळे हे बकरे विशेष चर्चेत आहेत. अनेक विक्रेते आपल्या बकऱ्यांना लहान मुलांप्रमाणे जपत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. पौष्टिक खाद्य, नियमित निगा आणि विशेष काळजी घेऊन या बकऱ्यांचे संगोपन केले जात असल्याने त्यांची किंमतही अधिक असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. रत्नागिरीतील चंपक मैदान येथे दरवर्षी भरविण्यात येणारी ही बकरा मंडी बकरी ईदपूर्वीची एक प्रमुख आकर्षण ठरत असते. जिल्ह्यासह बाहेरील भागांतूनही व्यापारी आणि खरेदीदार येथे दाखल होत असल्याने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या मंडीत सोजत, जमुनापारी, कोटा, सिरोही, बाराबरी, बोअर, गुजरी आणि मालवा या विविध जातींच्या शेळ्या आणि बकरे विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. प्रत्येक जातीची शारीरिक ठेवण, वजन आणि वैशिष्ट्ये वेगवेगळी असल्याने खरेदीदारांकडूनही त्यांना मोठी पसंती मिळत आहे. दरम्यान, बकरी ईद जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत मंडीतील व्यवहारांना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

