( रत्नागिरी /प्रतिनिधी )
“तू त्याचा नाद सोडून दे…” एवढ्या एका वाक्याने पेटलेल्या संतापातून मित्रानेच मित्राचा थरारक खून केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. कुवारबाव-साईनगर परिसरात घडलेल्या या रक्तरंजित हत्याकांडामागे प्रेमसंबंध, संशय आणि सूडाची भीषण भावना कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मुख्य संशयित सोहम म्हात्रे याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्र सूरज झोरे याचा काटा काढल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत सूरज झोरे याने मृत्यूपूर्वी केलेला व्हिडिओ जबाब आता या प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक पुरावा ठरत आहे. या प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेला सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे मृत्यूपूर्वी सूरज झोरे याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही सूरजने या व्हिडिओमध्ये आपल्यावर कोणी हल्ला केला आणि कोणी मदत करण्याचा प्रयत्न केला, याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पोलिसांसाठी हा व्हिडिओ ‘डायिंग डिक्लरेशन’प्रमाणे अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
या थरारक घटनेची सुरुवात २१ मेच्या रात्री झाली. मुंबईतील दहिसर येथे राहणाऱ्या सूरजची बहीण नंदा रमेश फाले यांना रात्री १०.५३ वाजता एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. “तुमच्या भावावर हल्ला झाला असून तो साईनगर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे,” अशी माहिती देण्यात आली. घाबरलेल्या नंदा यांनी तातडीने सूरजशी संपर्क साधला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या सूरजने रडत-रडत अंतिम सत्य बहिणीसमोर मांडले. “सोहम म्हात्रे, अभिषेक राठोड आणि नजीबुल शेख ऊर्फ सोनू यांनी पूर्वनियोजित कट रचून माझ्यावर कोयत्याने हल्ला केला,” असे सूरजने सांगितल्याचे समोर आले आहे.
पोलिस तपासात या हत्येमागचे कारण समोर येताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. घटनेच्या दिवशी मुख्य आरोपी सोहम म्हात्रेची मैत्रीणही रत्नागिरीत आली होती. यावेळी सूरज झोरे याने संबंधित तरुणीला “तू सोहमचा नाद सोडून दे,” असा सल्ला देत तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब समजताच सोहमच्या मनात सूरजबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला. “आमच्या दोघांमध्ये हा तिसरा नको,” या खुन्नसातूनच त्याने मित्राचाच गेम करण्याचा कट रचल्याचे तपासातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे, सोहमची मैत्रीण उपस्थित असतानाच तिच्यासमोर सूरजवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी सूरजवर कोयत्याने सपासप वार केले. जीव वाचवण्यासाठी सूरजने आटोकाट प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत घराशेजारी पुन्हा त्याच्यावर हल्ला चढवला. मानेवर, हातांवर आणि शरीराच्या विविध भागांवर झालेल्या वारांमुळे सूरज गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेतही तो मदतीसाठी धडपडत राहिला; मात्र अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणातील संबंधित तरुणीचाही जबाब पोलीस नोंदवणार असून, हत्याकांडामागील संपूर्ण कट, आरोपींची भूमिका आणि हल्ल्याचा नेमका घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
बातमी वाचा : एचडीएफसी बँकेचा डेप्युटी मॅनेजर बेपत्ता; चार पानी पत्रात सहकाऱ्यांवर गंभीर आरोप, चिपळूण हादरले

