(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने सुमारे १०२ कोटी २८ लाख ६१ हजार रुपयांचा पर्यटन विकास आराखडा मंजूर केला. सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या आराखड्यातील कामांचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, तब्बल सात वर्षांचा कालावधी उलटूनही आराखड्यातील अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पर्यटन विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आराखड्याची कामे तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ३१ मार्च २०२२ पर्यंत आराखडा पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश होते. मात्र, कोरोना महामारीचा कालावधी वगळता त्यानंतरची अनेक वर्षे उलटूनही आराखड्याची कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत.
दरम्यान, रखडलेल्या कामांना गती देण्याऐवजी केवळ आढावा बैठका घेण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे चित्र दिसत आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी गणपतीपुळे येथे विशेष बैठक घेऊन पर्यटन विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेतला होता. या बैठकीत संबंधित विभागांना रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाढत्या पर्यटकसंख्येचा विचार करून पुढील २० वर्षांसाठी सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्याची घोषणाही करण्यात आली.
मात्र, आधीच सात वर्षांपासून रखडलेला पर्यटन विकास आराखडा पूर्ण होण्याची प्रतीक्षा असताना आता नव्या २० वर्षांच्या मास्टर प्लॅनला प्राधान्य दिले जाणार की प्रलंबित आराखड्याची कामे आधी पूर्ण केली जाणार, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आराखड्यातील दर्शन रांग, विद्युत व्यवस्था आणि सुलभ शौचालयाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, स्वागत कमानीचे काम अद्याप अपूर्ण आहे. सांडपाणी व्यवस्थापनाची कामेही पूर्ण झालेली नाहीत. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जीएसआर आणि ईएसआर या दोन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, गावातील अंतर्गत पाइपलाइनचे काम सुमारे ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, चाफे ते गणपतीपुळे मुख्य जलवाहिनीचे काम अद्याप बाकी आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचे कामही अपूर्ण असून, या योजनेअंतर्गत पर्यटन विकास आराखड्याच्या निधीतून गणपतीपुळे ग्रामपंचायतीला दोन घंटागाड्या देण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या कामांमध्ये आपटा ते शासकीय विश्रामगृह या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच मोरया चौक ते बँक ऑफ इंडिया या मार्गावरील रानडे रोडचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यांना आवश्यक असलेले साइड गटारांचे काम अद्याप झालेले नाही.
पर्यटन विकास आराखड्यात पहिल्या टप्प्यात श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर व परिसराचा विकास, भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था सुधारणे, अधिक क्षमतेची सार्वजनिक स्नानगृहे व शौचालये उभारणे तसेच समुद्रस्नानासाठी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किनाऱ्यावर जागा आरक्षित करून बोयेज बसविणे आदी कामांचा समावेश करण्यात आला होता.
दुसऱ्या टप्प्यात सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ आणि सौरऊर्जा तसेच संकरित ऊर्जा प्रकल्पांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात गणपतीपुळे गाव आणि परिसरातील रस्त्यांच्या विकासाचा समावेश करण्यात आला आहे.
आराखड्यात आपटा तिठा ते मोरया चौकादरम्यानच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, संपूर्ण गणपतीपुळे गावासाठी एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित एक एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे, भूमिगत गटार व्यवस्था निर्माण करणे, घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारणे, गणपतीपुळे तसेच लगतच्या देऊड आणि चाफे गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, वाहनतळ विकसित करणे आणि त्यासाठी जागा अधिग्रहित करणे, जागेचे सपाटीकरण करून फायबर प्रसाधनगृहे उभारणे, शासकीय विश्रामगृहासमोर भाविकांसाठी दर्शन रांग व शेड उभारणे आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
याशिवाय गणपतीपुळे मंदिरासमोरील बंधाऱ्याची दुरुस्ती व सुशोभीकरण, मंदिर परिसरात एलईडी हायमास्ट व आकर्षक विद्युत खांब बसविणे, दुकान गाळ्यांचे बांधकाम आणि मोकळ्या जागेत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, स्वागत कमान उभारणे, सार्वजनिक शौचालय व चेंजिंग रूमचे नूतनीकरण, अधिक क्षमतेची सार्वजनिक स्नानगृहे, शौचालये आणि चेंजिंग रूम उभारणे, मंदिर व वाहनतळ परिसरात सौर किंवा संकरित ऊर्जा व्यवस्था उभारणे अशी कामेही प्रस्तावित आहेत.
आराखड्यातील कामांमध्ये मूल्यवृद्धी करण्यासाठी १० कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्याचीही योजना आहे. त्यामध्ये सुशोभीकरण व इतर आवश्यक सुविधा, मंदिर परिसरात मुषकाची प्रतिकृती बसविणे, मंदिर व परिसराची स्वच्छता व्यवस्था सुधारणे तसेच समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रस्नानाची जागा आरक्षित करून बोयेज बसविणे आदी कामांचा समावेश आहे.
गणपतीपुळे येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि पार्किंगच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख असताना येथील विकासकामांचा दर्जाही दर्जेदार असणे गरजेचे आहे. मात्र, आराखड्यातील महत्त्वाची कामे अद्याप रखडल्याने पर्यटन सुविधांवर त्याचा परिणाम होत असून, पर्यटकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
गणपतीपुळेचा वाढता पर्यटन विस्तार लक्षात घेता पर्यटन सुविधा, पर्यटकांची सुरक्षितता आणि दीर्घकालीन नियोजनावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी दिले आहेत. मात्र, नव्या नियोजनासोबतच आधीपासून रखडलेल्या पर्यटन विकास आराखड्यातील कामांना तातडीने गती देणे आवश्यक आहे. संबंधित विभागांनी केवळ आढावा बैठका न घेता प्रत्यक्ष कार्यवाही करून प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्याबाबत जिल्हा प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीमध्ये समन्वय व एकमत असणे गरजेचे आहे. गणपतीपुळे येथील उपलब्ध सोयी-सुविधांचा विचार करून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पर्यटन विकास आराखड्याला तातडीने चालना देण्याची आवश्यकता आहे.”
महेश ठावरे, माजी सरपंच, गणपतीपुळे

