(राजापूर / तुषार पाचलकर)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्याचे विभाजन करून पाचल हा स्वतंत्र तालुका घोषित करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. मात्र, नवीन तालुका निर्मितीबाबत शासन स्तरावर कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर, राजापूर पूर्व विभागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव पुढे आला होता. या कार्यालयामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी संपूर्ण दिवस खर्च करून राजापूरला जावे लागणार नाही, तसेच वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
दरम्यान, शासन स्तरावरील अधिकाऱ्यांनी पाचल परिसराची पाहणी करून सर्वेक्षणही केले असून, येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत सकारात्मक शिफारसी दिल्याची माहिती आहे. असे असतानाही अंतिम निर्णय मात्र अद्याप रखडलेला दिसत आहे.
वास्तविक पाहता, पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालय उभारण्यास कोणतेही ठोस अडथळे नसताना निर्णयाला होत असलेला विलंब नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निर्णयामागे राजकीय हस्तक्षेप तर कारणीभूत नाही ना? नागरिकांच्या सुविधांपेक्षा राजकारण मोठे ठरत आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
पाचल येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही निर्णय जाणीवपूर्वक रखडवला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. जनतेच्या मूलभूत सुविधांवर राजकीय स्वार्थाचे सावट पडत असल्याची उघड चर्चा आता गावागावांत सुरू झाली आहे.
राजापूर पूर्व विभागातील हजारो नागरिकांची गैरसोय होत असताना शासन आणि लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून असल्याने संताप वाढत आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय दबाव आणि हितसंबंध अधिक महत्त्वाचे ठरत आहेत का, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पाचलकरांच्या हक्काच्या प्रशासकीय सुविधेला वारंवार विलंब लावला जात असल्याने हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून राजकीय अडवणुकीचा प्रकार असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशाराही संतप्त नागरिकांकडून दिला जात आहे.
जनतेच्या हक्काच्या सुविधेला रोखून ठेवणाऱ्यांचे नेमके हितसंबंध काय, असा सवालही उपस्थित होत आहे. सर्वेक्षण, शिफारसी आणि सकारात्मक अहवाल असूनही निर्णयाला ब्रेक लागणे म्हणजे जनतेच्या भावनांची सरळ पायमल्ली असल्याची भावना व्यक्त होत आहे. राजकीय आकसातून पाचलला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप आता तीव्र होत असून, जनतेचा उद्रेक कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरू शकतो, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
सध्या या मुद्द्यावर राजापूर पूर्व विभागातील नागरिकांमध्ये संताप, तीव्र निराशा असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

